मुंबई महापालिकेच्या मालमत्तांत नगरसेवकांना आपला विकास निधी वापरण्याची परवानगी देण्यात आली असली तरी त्याचा गैरवापर नगरसेवकांकडूनच सुरू आहे. कुर्ला भाभा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर शिवसेनेने चक्क आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाणच कोरला आहे. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी आपल्या नगरसेवक निधीतून या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण केले आहे. परंतु या प्रवेशद्वाराच्या कमानीला भगवा रंग देत त्यावर धनुष्यबाणाची प्रतिमा कोरून रुग्णालय महापालिकेचे, पण प्रवेशद्वार शिवसेनेचे असल्याचे दाखवून देण्यात आले आहे.
सध्या भाभा रुग्णालय दुरुस्तीच्या कामासाठी बंद असल्याने बाह्यरुग्ण कक्ष व अपघात विभाग सुरू आहे. या रुग्णालयातील अनेक रुग्णांना राजावाडी किंवा घाटकोपरमधील मुक्ताबाई प्रसूती गृहात पाठवले जाते.
रुग्णालयाची इमारत धोकादायक बनल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुरुस्तीचे काम सुरू असताना प्रवेशद्वाराचे काम दुरुस्तीच्या कामांत न घेता नगरसेवकांच्या विकास निधीतून केले जात आहे. नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांच्या नगरसेवक निधीतून प्रवेशद्वाराच्या नूतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. परंतु महापालिकेच्या तिजोरीतून व करदात्यांच्या पैशांतून प्रवेशद्वाराच्या नूतनीकरणाचे काम झाले असताना या कमानीला भगवा रंग देऊन त्यावर पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाची प्रतिमा कोरण्यात आली आहे.
इतकेच काय तर हे प्रवेशद्वार महापालिकेने बनवले की शिवसेनेने असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुर्ला भाभा रुग्णालयाचे अधीक्षक प्रदीप आंग्रे यांच्याशी संपर्क साधता, त्यांनी रुग्णालय दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण विभाग आणि अपघात विभाग सुरू आहे. एखाद्या रुग्णाला गंभीर आजार असल्यास त्याला तातडीने राजावाडी रुग्णालय अथवा मुक्ताबाई प्रसूतिगृहात दाखल करायचे झाल्यास त्यासाठी पाच रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. परंतु या दुरुस्तीच्या कामांत प्रवेशद्वाराचा समावेश नसून सध्या केलेले काम हे ‘एल’ विभाग कार्यालयाने नगरसेवक निधीतून केल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी मात्र महापालिकेच्या मालमत्तांमध्ये नगरसेवक निधी वापरता येतो, असे स्पष्ट केले आहे. जर यावरील भगवा रंग आणि धनुष्यबाणाची कोणाला अॅलर्जी असेल त्यांनी समोर येऊन विरोध करावा.
धनुष्यबाणाचे डिझाईन हे वॉर्डाने मंजूर केले आहे. जर ते चुकीचे होते तर त्यांनी ते रद्द करायला हवे होते, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रवेशद्वार नगरसेविकेने बनवून दिल्याने स्थानिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. मात्र प्रत्यक्षात हे रुग्णालय महापालिकेच्या नव्हे तर शिवसेनेच्याच मालकीचे असल्याच्या थाटात प्रवेशद्वारावर धनुष्यबाणाची प्रतिमा कोरण्यात आल्याने स्थानिकांत तीव्र नाराजी आहे.

