मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ठाण्यातील गांधीनगर पोखरण मार्ग क्रमांक २ वरील तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. १० मे रोजी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असून ११ मे रोजी रात्री ११ वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी तब्बल ३६ तासांचा पाणीब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई परिसरात तब्बल २५ टक्के पाणीकपात केले जाणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सर्व धरणांमध्ये कमी प्रमाणात पाण्याचा साठा जमा झाल्यामुळे मुंबईकरांवर आधीच २० टक्के पाणीकपात सुरू आहे. या पाणीकपातीतही मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची नाराजी जनतेमध्ये नाही. पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळेच मोर्चे आणि आंदोलने केली जात नाहीत. पाणीकपातीची झळ सहन केली जात असतानाच येत्या मंगळवारी व बुधवारी मुंबईकरांना २५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.
ठाण्यातून मुंबईला पाणीपुरवठा करणारी १८०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला गळती असल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम गांधी नगर, पोखरण मार्ग २ येथे हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठय़ात मंगळवारी सकाळी ११ आणि बुधवारी रात्री ११ या कालावधीत २५ टक्के कपात केली जाणार असल्याचे जलअभियंता विभागाने जाहीर केले आहे.
पाणी वितरणाच्या टोकाकडील भागात, उंचावरील विभागात व शहर विभागातील थेट पाणीपुरवठा होत असलेल्या इमारतींमध्ये कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होणार आहे.
त्यामुळे खबरदाराची उपाय म्हणून मुंबईकरांनी आदल्या दिवशीच पुरेसा पाणीसाठा करावा व पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन उपायुक्त (जल) रमेश बांबळे यांनी केले आहे.
