मुंबईत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा!

मुंबईत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा!

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करून उत्साह आणि जल्लोषमय वातावरणात रविवारी मुंबई आणि परिसरात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, मुंबई पोलीस, अग्निशमन दलाकडून मानवंदना यावेळी हुतात्म्यांना देण्यात आली. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हुतात्मा चौकातील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे ध्वजारोहण सोहळा पार पडला.

विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी, शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यावेळी मानवंदना दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, माजी खासदार एकनाथ गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, काँग्रसचे सरचिटणीस भूषण पाटील, संदेश कोंडविलकर व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन केले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, प्रवक्ते नवाब मलिक यांनी हुतात्मा चौकातील स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर चन्ने, नगरसेवक, स्वातंत्र्य सनिक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी तावडे यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कार सागर कैलास ओहोळकर (मल्लखांब), सोनाली बोराडे (जिम्नॅस्टिक), सतीश कदम (कुस्ती) यांना तर युवा पुरस्कार कृपाली बिडये, सिद्धेश्वर वाकचौरे (युवक) व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ट्रस्ट कांदिवली या संस्थेला देण्यात आले.

पथकांची संचलने

महाराष्ट्र दिनाचा मुख्य सोहळा राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे संपन्न झाला. यावेळी राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस, अग्निशमन दल, निशाण टोळी, गृहरक्षक दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), नागरी संरक्षण दल (पुरुष), नागरी संरक्षण दल (महिला), बृहन्मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, बॅण्ड पथक, पाईप बँड पथक, आदींनी संचलन केले. तसेच याप्रसंगी मोटार परिवहन आणि मुंबई अग्निशमनच्या वाहनांचे संचलन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *