देशातील बँकांना कोट्यवधीचा चुना लावून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने गेल्याच महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ट्रम्प प्लाझा या आलिशान वस्तीत एक कोटी डॉलर्सला आलिशान फ्लॅट खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मल्ल्याने २०१० मध्ये ४० लाख ६० हजार डॉलर टोकन रक्कम दिली होती. हे पेंटहाऊस मल्ल्याने आपली मुलगी तान्या हिच्या नावाने घेतले आहे. मल्ल्या याला २०१५ मध्ये ट्र्म्प प्लाझाकडून पत्र आले होते आणि उर्वरित रक्कम ताबडतोब भरण्यास सांगितले होते.
उर्वरित रक्कम मल्ल्याने मार्चमध्ये अदा केली, असे वृत्त आहे. त्याच वेळेला सक्तवसुली संचालनालयाने मल्ल्याविरोधात कारवाई गतिमान केली होती.
दरम्यान, सध्या मल्ल्या इंग्लंडमध्ये फरार असून त्याच्याविरोधात कर्ज बुडवल्याप्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. अतिरिक्त २४६८ कोटी रुपये भरण्याची तयारी मल्ल्याने दर्शवली असून तसे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.
त्या अगोदर मल्ल्याने ४,४०० कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवली आहे. मल्ल्या ला भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय प्रयत्न करत आहे. ईडीने तशी विनंती केली आहे. मल्ल्याचा राजनैतिक पासपोर्ट निलंबित करण्यात आला आहे.