खोपोलीत इमारतीला आग

खोपोली शहरातील आशियाना व्हिलेज या इमारतीला रविवारी शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत दोन बालके अडकली होती परंतू नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना बाहेर काढण्यात यश आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.  मात्र आगीत इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.    खोपोली शहरातील विनानगर परिसरातील आशियाना व्हिलेज नं.2 या इमारतीत  जवळपास  32 कुटुंबे वास्तव्यात आहेत. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या मिटरच्या बॉक्समध्ये अचानक शॉर्टसर्कीट होऊन इमारतीला आग लागली. दुपारी 2.30 च्या दरम्यान हा प्रकार घडला.

काही क्षणातच आगीचा भडका वाढत इमारतीचा भाग पूर्णपणे धुराने वेढला होता यावेळी इमारतीत दोन लहान मुले अडकून पडल्याचे लक्षात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी इमारतीत प्रवेश करुन दोन्ही मुलांचे जीव वाचवले. सदरच्या आगीची माहिती मिळताच खोपोली न.पा.चे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटना स्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले.आग विझविण्यासाठी येथील रहिवासी वर्गानेही मोलाची कामगिरी केल्याने  आग आटोक्यात आणण्यात लवकर यश आले. या आगीमुळे या भागातील विद्युत प्रवाह करणारी उच्चदाबाची मशीन काही काळ बंद पडल्याने या भागातील विद्युत पुरवठा काही काळ खंडीत झाला होता. त्यानंतर खोपोली वीज वितरण कर्मचारी वर्गाने येथील विद्युत पुरवठा सुरळीत केला. या आगीत या इमारतीतील सर्व मीटर जळून खाक झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *