आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी दहशतवादी संघटना इसिसला शांततेचा प्रस्ताव दिला होता. त्यास उत्तर म्हणून इसिसने चक्क शिरच्छेद केलेल्या ओलिसाचे छायाचित्र पाठवून आम्ही तुमचाही असाच शिरच्छेद करू शकतो, असे उत्तर दिले. हा रविशंकर यांना धोक्याचा इशारा आहे, असे मानले जाते.
खुद्द रविशंकर यांनीच शुक्रवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी इसिसकडे शांततेबाबत चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर त्यांनी माझ्याकडे ओलिसाचे शिरच्छेद केलेले छायाचित्र पाठवले आहे. त्यावरून त्यांना शांतता नकोच आहे, असे स्पष्ट होते. अशा संघटनांवर कडक कारवाई करणेच योग्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सर्व विचारधारा एकत्र नांदाव्यात व सर्व धर्म एक यावेत, या हेतून इसिसला शांतता प्रस्ताव दिला होता. पण त्यांनी तो फेटाळून लावला. माझी घोर निराशा झाली आहे, असे रविशंकर म्हणाले. इसिससारख्या संघटनांवर कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.