पुण्यातील डॉक्टरने दवाखान्यातच केली आत्महत्या

पुण्यातील डॉक्टरने दवाखान्यातच केली आत्महत्या

शारीरिक व मानसिक आजाराला कंटाळून पुण्यातील एका डॉक्टरने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

शिवाजी रोड, शुक्रवार पेठ येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य नितीन अंबिके (५५) यांनी त्यांच्या दवाखान्यात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मानेवर ब्लेडने वार करुन आत्महत्या केली.

खडक पोलीस ठाण्यासमोरच्या बिल्डिंगमध्ये अंबिके यांचा दवाखाना आहे. त्यांचा दवाखान्यात डॉक्टरने लेटरपॅडवर लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली आहे. या चिठ्ठीत शारीरिक व मानसिक आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. तसेच अवयव दान करावे, असेही चिठ्ठीत लिहिले आहे.

शनिवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे दवाखाना उघडला. दहाच्या सुमारास त्यांची पत्नी त्यांना भेटून गेली. दवाखान्यामध्ये कोणीही नसताना दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी ब्लेडने स्वत:चा गळा कापला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

दुपारी एकच्या सुमारास त्यांची पत्नी दवाखान्यात परत आली असता डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. आरडाओरडा करीत त्या बाहेर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *