भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी आज शुक्रवारी सकाळी त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. मंदिराच्या नियमानुसार तृप्ती देसाई यांनी साडी नेसून गर्भगृहात प्रवेश केला आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. तृप्ती देसाई यांना अगोदर मंदिरात प्रवेश देण्यापासून रोखण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांना गाभा-यात जाण्याची परवानगी देण्यात आली. तृप्ती देसाई येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तृप्ती देसाईंसोबत त्यांच्या 4 कार्यकर्त्यांनीदेखील दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर आपल्याला आनंद झाल्याची प्रतिक्रिया तृप्ती देसाईंनी व्यक्त केली. सर्व धर्मातील मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचं तृप्ती देसाईंनी यावेळी सांगितलं आहे.
महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करणा-या तृप्ती देसाईंना यावेळी मात्र महिलांच्याच विरोधाला सामोरे जावे लागले. त्र्यंबकेश्वरवासियांनी काळे झेंडे लावून तृप्ती देसाईंचा निषेध केला. तृप्ती देसाई पोलिसांचा वापर करुन धार्मिक भावना दुखावत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. निषेध म्हणून एकही महिला आज मंदिरात जाणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वरच्या महिलांनी दिली आहे. तसंच तृप्ती देसाई प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.