रुपीच्या खातेदारांसाठी थत्तेंचे 1 मे पासून बेमुदत उपोषण

रुपीच्या खातेदार आणि ठेवीदारांना कोरडी आश्‍वासने देऊन गेले अनेक महिने नुसतेच खेळवले जात असून त्यांच्या अडकलेल्या पैशांच्या बाबतीत 1 मे पर्यंत अंतिम निर्णय घ्यावा अन्यथा त्या दिवसापासून आमरण उपोषण करण्याचा इशारा पुणे नागरिक कृती समितीतर्फे मिहीर थत्ते यांनी दिला आहे.
या संबंधात त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सहकार मंत्र्यांना निवेदन पाठवले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की गेले काही दिवस रुपी बॅंकेच्या खातेदारांना नुसतेच खेळवले जात आहे.

त्यांचे हे खेळवणे थांबून त्यांच्या मागण्यांविषयी ठोस निर्णय 1 मेच्या आत झाला नाही तर आपण आमरण उपोषणाला बसणार आहोत. सुमारे सात लाख नागरिकांच्या हिताचा हा प्रश्‍न आहे. त्याची अशी हेळसांड करणे योग्य नाही. सरकारने या खातेदारांना इतक्‍या दिवसांत केवळ कोरडी आश्‍वासने देऊन खेळवत ठेवले आहे. रुपीचे प्रशासकही अकार्यक्षम असल्याचा आरोपहीं थत्ते यांनी केला आहे. मल्ल्या सारखा उद्योगपती बॅंकांचे हजारो कोटी रुपये बुडवून डोळ्यादेखत देशाबाहेर निघून जातो आणि रुपीचे खातेदार मात्र आपल्याच पैशांसाठी तीन वर्षे चपला झिजवत फिरत आहेत ही स्थिती दुर्दैवी आहे, असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *