रोजची दगदग, धकाधकीची जीवनशैली स्वीकारून पायाला चाके बांधल्यागत घडय़ाळाच्या काटय़ाबरोबर स्पर्धा करणा-या मुंबईकरांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शहरात दररोज ३३ जणांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजारामुळे होत असल्याचे वास्तव उजेडात आले असून ही धोक्याची घंटा मुंबईकरांनी लक्षात घ्यायला हवी. मार्च २००१ ते मार्च २०१५ या पंधरा वर्षात १ लाख ९४ हजार ९८२ मुंबईकरांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने माहितीच्या अधिकारातून दिली आहे.
मागील काही वर्षात हृदयविकाराने मृत्यू होणा-या रुग्णांच्या संख्येत तिप्पटीने वाढ होत आहे. २००१ मध्ये हृदयाचा झटका आल्याने ८,१५८ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०१५ मध्ये हीच संख्या २९,३९३ वर जाऊन पोहोचली आहे.
त्याखालोखाल कर्करोगग्रस्त रुग्णांचा नंबर लागतो तर तिस-या क्रमांकावर क्षयरुग्ण आहेत. २०१४-१५ मध्ये ७ हजार २७२ मुंबईकरांचा कर्करोगाने मृत्यू झाला. मागील पंधरा वर्षात कर्करोगग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा ८०,०३१ इतका आहे. ‘टीबी हारेगा.. देश जितेगा’ या योजनेंतर्गत महापालिका प्रशासनाद्वारे क्षयरोगावर मात करण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे क्षयरोग रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. २००१ मध्ये ९ हजार ३४५ जणांचा क्षयरोगाने मृत्यू झाला होता. तर २०१४ मध्ये ५,९५३ जणांना या आजाराची लागण झाल्याचे आकडेवारी सांगते. मुंबईकरांची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदारी, खाण्याच्या व झोपण्याच्या अनिश्चित वेळा, नियमित व्यायामाचा अभाव या सगळ्या बाबी हृदयविकाराला आमंत्रण ठरत आहेत.
प्रवासाच्या वेगवान सुविधा, कार्यालयात दिवसभर संगणकासमोर बसून काम अशा परिस्थितीत मुंबईकरांचे चालणेही अत्यंत कमी झाले आहे. चालण्यासारखा साधा-सोपा पण अत्यावश्यक व्यायामही देहाला मिळेनासा झाल्याचाही अनिष्ट परिणाम आपल्या आरोग्यावर पडला आहे. इंटरनेट, गुगल व व्हॉट्सअॅपसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या जाळय़ात अडकलेली तरुणाई बैठय़ा कामांमध्ये अडकली आहे. इंटरनेटवरून कोणतीही माहिती सहज उपलब्ध होत असल्याने मेहनत करण्याची ते टाळाटाळ करतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून किमान २० मिनिटे तरी चालण्याचा व्यायाम करणे गरजेचे आहे, असा सल्ला जेजे रुग्णालयातील चिकित्सक डॉ. चिंतन पटेल यांनी दिला आहे.
‘चालाल तर वाचाल’ असा नवा आरोग्यमंत्र मुंबईकरांना स्वीकारण्याची गरज या धोक्याच्या घंटेमुळे अनिवार्य झाली आहे.
हृदयविकाराची कारणे
- बदलती जीवनशैली
- कामाचा ताण
- कौटुंबिक जबाबदारी
- खाण्याच्या व झोपण्याच्या अनिश्चित वेळा
- नियमित व्यायामाचा अभाव
- श्वास घेण्यास अडचणी जाणवणे
- चालताना दमा व थकवा येणे
- सुका खोकला येणे
- छातीत दुखणे
- डावा हाताला चमक भरल्यासारखे जाणवणे

