दुष्काळग्रस्त लातूरची तहान भागविण्यासाठी मंगळवारी रात्री निघालेल्या “जलदूत‘ एक्सप्रेसची दहावी खेप आज (बुधवार) सकाळी लातूरमध्ये दाखल झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
फडणवीस यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, ‘पाच लाख लिटर पाणी नेणाऱ्या नऊ खेपा अधिक 25 लाख लिटर पाणी नेणारी एक खेप असे एकूण 70 लाख लिटर पाणी लातूरला पाठविले आहे.‘ या कामी प्रशासनाने कठोर परिश्रम घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. लातूरमधील भीषण दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी सांगलीतून रेल्वेने पाणी पोचविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 12 एप्रिल रोजी पहाटे पाचच्या सुमारास पाच लाख लिटर पाणी घेऊन पहिली “जलदूत‘ एक्सप्रेस लातूरला पोचली होती.
पाणीटंचाईमुळे मिरजेतून लातूरला पाणीपुरवठ्याचा निर्णय झाल्यानंतर रेल्वे जलशुद्धीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत जलवाहिनी व उच्च क्षमतेच्या मोटारी बसविण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. या यंत्रणेद्वारे रेल्वे स्थानकातील हैदरखान विहिरीत नदीच्या पाण्याचा साठा करून ते पाणी रेल्वे टॅंकरमध्ये भरण्यास मंगळवारी सुरुवात झाली. गेले नऊ दिवस दररोज पाच लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात येत होते. आता उच्च दाबाने टॅंकर भरण्याची व्यवस्था झाल्याने व 50 टॅंकरच्या दोन रेल्वे उपलब्ध झाल्यामुळे लातूरकरांना दररोज 25 लाख लिटर पाण्याचा पुरवठा होणार आहे.

