सीलिंकची सफर जीवावर बेतली

सीलिंकची सफर जीवावर बेतली

वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील सफर विलेपार्लेतील तरूणांच्या जीवावर बेतली. मध्यरात्री एकच्या सुमारास या तरूणांची भरधाव सुमो पुढे चाललेल्या आय-20 कारला धडकून झालेल्या अपघातात अंकित फोंडकर(28) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सुमोतील अन्य चार मित्र जखमी झाले मात्र सागरी सेतूच्या भक्कम संरक्षक भिंतीमुळे थोडक्यात बचावले. या अपघानंतर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सेतूवर आलेल्या संजय मोरे(35) या शिपायाला समोरून आलेल्या भरधाव लॅन्सरने धडक दिली. त्यात मोरे गंभीररित्या जखमी झाले. वरळी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या दोन्ही चालकांना गजाआड केले.

वरळीचे वरिष्ठ निरिक्षक विनय कुलकर्णी यांच्या माहितीनुसार विलेपार्लेला राहाणारे फोंडकर, संदेश नागवेकर(28), विलास नवले(23), निखिल धोत्रे(22), भावेन पटेल(23), अंकित पेडणेकर(24) या सर्वांनी मित्राची सुमो(एमएच 08 सी 7203) घेतली आणि मध्यरात्री सेतूवर आले. या सर्वांना सेतूवरून सफर करायची होती. नागवेकर सुमो चालवत होता. सेतूवर आल्यानंतर त्याने सुमोचा वेग वाढवला.

मात्र एका क्षणी त्याचे सुमोवरील नियंत्रण सुटले आणि पुढे चाललेल्या आय-20 कारला धडक बसली. त्यानंतर सुमो दोनवेळा पलटी झाली आणि सेतूच्या संरक्षक भिंतीला जाउन आदळली. या अपघातात फोंडकरचा जागीच मृत्यू झाला. तर चालक नागवेकर वगळता उर्वरित चौघे जखमी झाले. त्यांना उपचारार्थ केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच वरळी व वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी सेतूवर आले. अपघातामुळे वरळीकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक दलातील पोलीस पुढे सरसावले. त्यावेळी वांद्रयाच्या दिशेने आलेल्या एका भरधाव लॅन्सर कारने पोलीस शिपाई मोरे यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की मोरे यांचा हात फ्रॅक्चर झाला. त्यांनाही उपचारार्थ केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. कुलकर्णी यांच्या माहितीनुसार दोन्ही अपघातांना जबदादार असलेले चालक नागवेकर(सुमो) आणि धीरज संसारे(लॅन्सर) यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यावरून अपघातावेळी ते दारूच्या नशेत होते का ते स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *