नोकरीत पदोन्नती, वेतनवाढ अथवा पुरस्कार मिळवण्यासाठी काही खेळाडू बोगस क्रीडा प्रमाणपत्र सादर करतात, असा दावा करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
माजी खेळाडू सलाउद्दीन अन्सारी यांनी ही याचिका केली आहे. काही खेळाडू विशेष वेतनवाढ मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर करतात; तर काही जण महत्त्वाचे पुरस्कार मिळवण्यासाठी खोटी माहिती देतात, असे त्यांचे म्हणणे आहे. गैरप्रकार करणाऱ्या खेळाडूंमुळे गुणवान आणि पात्र खेळाडूंना पुरस्कारापासून वंचित राहावे लागते, असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. राज्य सरकारकडे वेळोवेळी तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत राज्य सरकारने 2006 मध्ये एक निर्णय जाहीर केला होता; मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.
न्यायालयाने अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी समिती नेमावी आणि कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कायद्याखाली महत्त्वाचा तपशील मिळाला आहे, असा त्यांचा दावा आहे. न्यायालयात याचिकेवर लवकरच सुनावणी होईल.