ओडिशात भीषण अपघात; 30 मृत्युमुखी

ओडिशा राज्यामधील देवगड येथील डोंगराळ प्रदेशात बस दरीत कोसळून झालेल्या एका अपघातामध्ये किमान 30 नागरिक मृत्युमुखी पडले.

ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्‍वरपासून हे ठिकाण सुमारे 350 किमी अंतरावर आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक हे बारगड जिल्ह्यामधील भारती गणनाट्य या स्थानिक नाटक मंडळीमधील कलावंत होते. मृतांमध्ये काही महिला व एका लहान मुलाचाही समावेश आहे. संबलपूर येथे जात असलेल्या या बसमधून एकूण 38 कलावंत व इतर कर्मचारी प्रवास करत होते.

येथील डोंगराळ भागामधील एका तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस संरक्षक कठडा तोडून थेट दरीत कोसळली. दरम्यान, राज्यामधील आपत्ती व्यवस्थापन पथक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने मदतकार्य सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र पहाडी भाग; आणि अंधार पडल्याने मदतकार्यात अडचणी आल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघातामध्ये अन्य आठ जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांमधील सात जणांची प्रकृती गंभीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *