धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य इमारतीला आग लागली असून या आगीत बँकेतील २५ ते ३० संगणक आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. रविवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजलेले नाही. मात्र आग लागताच काही मिनिटात या आगीने रौद्र रुप धारण केले. ही आग इमारतीचा तिसरा आणि चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली.
आग विझवण्यासाठी धुळे महानगरपालिकेच्या पाच अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या. त्याबरोबरच शिरपूर, मालेगाव, दोंडाईचा, अमळनेर इथून गाड्या दाखल झाल्या होत्या. तब्बल पाच तासांनी ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांना यश आले. यामध्ये दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
या आगीत बँकेचे मोठे नुकसान झाले असून बँकेचा डेटा सेंटर, रेकॉर्ड रुम सुरक्षित असल्याचा दावा बँकेच्या वतीने करण्यात आल्याचे समजते.