जपानमध्ये पुन्हा भूकंप, १९ जणांचा मृत्यू

जपानमध्ये पुन्हा भूकंप, १९ जणांचा मृत्यू

जपानमध्ये शनिवारी पुन्हा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल एवढी होती. अवघ्या २४ तासांच्या अंतराने पून्हा याच कुमामोतोमध्ये झालेल्या या भूकंपात १९ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचे केंद्र कुमामोतोमध्ये जमिनीपासून खाली ७ कि. मी. अंतरावर होते.

जपानमध्ये सलग तीन दिवसात चार वेळा भूकंपाचे मोठे धक्के बसले. गुरूवारी कुमामोतोमध्ये झालेल्या भूकंपात ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर अन्य ८०० जण जखमी झाले. या भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. ६.५ रिश्टर स्केल क्षमतेचा हा भूकंपाचा धक्का होता. तर जपानच्या काही भागात पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू हा सतहपासून १० किमी अंतरावर होता.

त्यानंतर ४० मिनिटांनी आणखी एक ५.७ तीव्रतेचा भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपाच्या धक्क्याने अनेक घरे जमीनदोस्त होवून वीजपुरवठाही खंडीत झाला. भूकंपग्रस्त भागातून आत्तापर्यंत ४० हजार नागरिकांना स्थलांतरीत केले आहे. नागरिकांना मदत आणि सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, सलग तिस-या दिवशी झालेल्या भूकंपाने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *