नेदरलँडच्या नौदलासाठी अलिबाग येथील मरीन फ्रन्टिअर्स या कंपनीने ३६ मीटर लांबीच्या अॅल्युमिनियम गस्ती नौकेची निर्मिती केली आहे. भारतीय बनावटीची, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली अॅल्युमिनियम बोट विभागात मोडणारी ही आजवरची सर्वात मोठी बोट आहे. यापूर्वी कंपनीने मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांसाठी बुलेटप्रूफ गस्ती नौकांची निर्मिती केली होती. यानंतर नेदरलँडच्या नौदलासाठी या भव्य गस्ती नौकेची निर्मिती करण्यात आली आहे. ताशी २५ ते ३० नॉटिकल वेगाने प्रवास करण्याची या बोटीची क्षमता आहे. बॅलिस्टिक प्रोटेक्शन सिस्टीम, जीपीएसप्रणाली, ऑटो संचलनप्रणाली, अग्निशमनप्रणाली यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १३५० एचपी क्षमतेच्या तीन इंजिन क्षमतेच्या या बोटीवर एकावेळी ७० ते ८० नौसनिक वास्तव्य करू शकतात. या बोटीत, त्यांच्या राहण्याची, बसण्याची, जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. बोटीवर स्वत:ची जलशुद्धीकरण प्रणाली कार्यरत करण्यात आली असून दर तासाला ३ हजार लिटर पाणी शुद्ध करता येऊ शकेल. या कंपनीने यापूर्वी कझाकिस्तान आणि यूएईला बोटी निर्यात केल्या आहेत. या प्रामुख्याने तेल गळती रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटींचा, आणि खासगी स्पीड बोटींचा समावेश होता. मात्र एखाद्या देशासाठी गस्ती नौका निर्यात करण्याची ही कंपनीची पहिलीच वेळ असल्याचे कंपनीचे प्रमुख आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
