कणकवलीत 53 हजारांचा गुटखा जप्त

गुटखा विक्रीस कायदेशीर प्रतिबंध असतानाही ओमनी गाडीतून बेकायदेशीररीत्या विक्रीच्या उद्देशाने गुटखा वाहतूक करताना आढळून आल्याप्रकरणी रवींद्र रमेश यादव (वय 33, कलमठ-नाडकर्णी चाळ) याच्या विरुद्ध अन्न व सुरक्षा माणके कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून 53 हजार 130 रुपयांचा गुटखा आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करण्यात आली.    सोमवारी सकाळी तरंदळे मार्गावर रवींद्र रमेश यादव याच्या ताब्यातील मारुती ओमनी गाडीतून गुटख्याची वाहतूक होत असल्याची टीप कणकवली पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन त्याला गाडी व मालासह चौकशीसाठी कणकवली पोलिस स्टेशनला आणले. तसेच औषध व अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाला याबाबतची खबर दिली. या विभागाच्या अधिकार्‍यांनी गाडीत पकडलेल्या मालाची खात्री केली असता त्यात गुटखा असल्याचे आढळून आले. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालय ओरोस यांच्या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत शिवराम पवार यांनी कणकवली पोलिसात रवींद्र रमेश यादव (रा. कलमठ, मूळ गाव कट्टा-मालवण) याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्याच्याकडून सागर गुटख्याची 90 पॉकेटस्, आरएमडी पान मसाल्याची 44 पॉकेटस्, सँटेड टोबॅको गोल्ड तंबाखूची 120 पॅकेटस् असा मिळून 53 हजार 130 रूपयांचा माल जप्त करण्यात आला. राज्य शासनाने गुटखा विक्रीस बंदी घातली असताना तसेच गुटखा हा आरोग्यास अपायकारक असल्याची जाणीव असूनही आरोग्यास अपाय करण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी वाहतूक करताना रवींद्र यादव हा आढळून आल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक श्री. देशमुख करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *