भावाला वाचविण्यासाठी जीव लावला पणाला!

कपडे वाळत घालताना तारांमध्ये करंट येऊन मोठ्या भावाला इलेक्‍ट्रिक शॉक लागल्याचे पाहून त्याचा जीव वाचविण्यासाठी लहान भावाने जिवाची पर्वा न करता त्याला सोडविण्याचा जोरदार प्रयत्न केला. भावाचा मृत्यू डोळ्यासमोर पाहत त्याने सर्व शक्‍ती पणाला लावली. मात्र, नियतीला काही औरच मान्य होते. मोठ्या भावाला वाचविण्यात त्याला यश आले; मात्र स्वतःला प्राण गमवावा लागल्याची घटना सोमवारी घडली. मोठ्या भावावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रितिक मानसिंग पाल (वय 11) असे मृत्यू पावलेल्या दुर्दैवी लहान भावाचे नाव आहे तर निखिल मानसिंग पाल (वय 12, रा. कस्तुरबानगर) असे जखमी मुलाचे नाव आहे. हृदयाचा थरकाप आणि बंधुप्रेमाचे उदाहरण ठरलेली ही घटना आहे.
मानसिंग पाल (वय 40) हे पत्नी व मुलगा निखिल व रितिकसह कस्तुरबा नगरात राहतात. ते कुल्फी विक्रीचा व्यवसाय करतात. निखिल व रितिक हे सहाव्या वर्गात शिक्षण घेतात. घराला लागूनच एक विद्युत रोहित्र (डीपी) आहे. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास निखिल आणि रितिक दोघांनाही आंघोळ करून शाळेत जायचे होते. वडील कामावर गेले होते तर आई घरात स्वयंपाक करीत होती. दरम्यान, ही घटना घडली. 
शाळेत जाण्याची घाई नडली! 
निखिलने पटकन्‌ आंघोळ केली आणि ओले कपडे घरासमोरील डीपीच्या एका अँगलवर सुकविण्यासाठी टाकायला गेला. या दरम्यान, या लोखंडी तारेत विद्युत प्रवाह आल्यामुळे त्याला जोरदार विद्युत धक्का लागला. त्यामुळे निखिलने आरडाओरडा केला. भावाला वाचवण्यासाठी रितिकने प्रयत्न केले. शेवटच्या प्रयत्नाला त्याला यश आले. मात्र, रितिकलादेखील जोरदार विद्युत धक्का लागल्याने त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *