भारतीय रेल्वेच्या इतिहासातील शेवटच्या डिसी (डायरेक्ट करंट) लोकलच्या आठवणींना उजाळा देत शनिवारी आणि रविवारच्या मध्यरात्री शेवटच्या डीसी लोकलला निरोप देण्यात आला. त्यानंतर, हार्बर मार्गावरील पहिली एसी(अल्टरनेटीव्ह करंट) लोकल हार्बर मार्गावर रविवारी पहाटे धावली आणि अखेर देशातील डीसी पर्वाचा अस्त झाला.
या लोकलची शेवटची झलक पाहण्याकरता मध्य रेल्वेने जोरदार तयारी केली होती. त्याला रेल्वेचे कर्मचारी आणि प्रवासी संघटनांसह रेल्वे प्रवाशांनी जवळच्या स्थानकात हजेरी लावून या ऐतिहासिक पर्वाला जोरदार दाद दिली.
हार्बर मार्गावर ३ फेब्रुवारी १९२५ सालापासून सुरु असलेली डीसी विद्युत प्रवाहावरील लोकलची धडधड अखेर शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री थांबली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत सर्व सुरक्षा चाचण्या घेतल्यानंतर रविवारी पहाटे हार्बर आणि ट्रांसहार्बर मार्गावरील लोकल एसी विद्युतप्रवाहावर धावू लागल्या.
पहाटे ४.४२ परिवर्तनाचे काम पूर्ण झाल्यानंतर पहाटे ४.४६ वाजता पनवेल ते वाशी दरम्यान अप मार्गावर पहिली एसी विद्युत प्रवाहावर धावणारी लोकल चालवण्यात आली.
त्यानंतर डाऊन दिशेला पहाटे ५.४० वाजता वाशी-पनवेल, तर ट्रांसहार्बर मार्गावर ५.११वाजता ठाणे ते नेरुळ, ५.२४ वाजता नेरुळ-ठाणे, तर हार्बर मार्गावर डाऊन दिशेने ५.४५ वाजता सीएसटी-वाशी आणि अप मार्गावर ५.५० वाजता वाशी-सीएसटी या लोकल चालवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
त्यामुळे येत्या काळात मध्य रेल्वेची विजेची मोठी बचत होणार असल्याने याचा मोठा आर्थिक फायदा मध्य रेल्वेला होणार आहे. शिवाय, नव्याने दाखल होणा-या लोकल देखील चालवणे शक्य होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल, तसेच लोकलचा वेग देखील वाढेल असा दावा करण्यात येत आहे.