केरळच्या पुत्तिंगल देवी मंदिरातील अग्नितांडव प्रकरणी केरळ पोलिसांनी आज सकाळी पाच जणांना अटक केली आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या पाचही जणांचा सहभाग असल्याचे कळते. मंदिर दुर्घटनेत १०६ मृत्युमुखी पुत्तिंगल देवी उत्सवाच्या निमित्ताने आतषबाजी करण्यात येते. यासाठी फटाक्यांचा मोठा साठा मंदिराजवळ करण्यात आला होता. उत्सवाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या आतषबाजीदरम्यान फटाक्याच्या गोदामावर ठिणगी पडल्याने स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत १०६ भाविकांचा मृत्यू झाला असून,३८० जण जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेनंतर केरळ पोलिसांकडून मंदिराच्या पदाधिका-यांचा शोध सुरु होता. आतषबाजी आयोजित करणा-या वर्कला कृष्णकुट्टी आणि कझाकुत्तम सुरेंद्रन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच, या प्रकरणी मंदिर प्रशासनाच्या अधिका-यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिराजवळ एवढय़ा मोठय़ा प्रमाणात फटाक्यांचा साठा करू नका, असे पोलिसांनी बजावले होते. मात्र, स्थानिकांनी त्यांचे न ऐकल्यामुळे या भीषण दुर्घटनेला सामोरे जावे लागले. मंदिराच्या आवारात असलेली एक इमारतही या स्फोटामुळे कोसळली. त्याखाली सापडूनही अनेक भाविक मृत पावले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की मंदिराच्या एक किलोमीटर परिघातील घरांच्या काचा फुटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.