जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (गुरुवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. या गोळीबारात हिज्बुलचे कमांडर असलेले दोन दहशतवादी ठार झाले. या दोघांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
नसीर अहमद आणि वसीम माला अशी या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरचे माजी माहिती व प्रसारण मंत्री अल्ताफ बुखारी यांच्या घरी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांकडीन दोन रायफल घेऊन हे पसार झाले होते. तेव्हापासून यांचा शोध घेण्यात येत होता.