जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच

अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्याविरोधातील आंदोलन जे . जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सुरूच ठेवले आहे. या दोन्ही डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांचा छळ होत असून त्यांना पदावरून हटवल्याखेरीज महाविद्यालयात हजेरी लावणार नसल्याचे रविवारी जे. जे. मधील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने स्पष्ट केले. रुग्णाच्या उपचारांबाबत हेळसांड केल्याप्रकरणी कारवाई होण्याच्या भीतीने केवळ काही डॉक्टर हे आंदोलन करत असून इतर निवासी डॉक्टर आंदोलनात सहभागी झालेले नाहीत, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. नेत्ररूग्ण विभागातील निवासी डॉक्टरांकडून दिवसाला १४ ते १५ तास काम करून घेतले जाते. परिचारिका व शिपायांनी करावयाची कामे निवासी डॉक्टरांना सांगितली जातात, मात्र शस्त्रक्रियांसारख्या अभ्यासात सामावून घेतले जात नाही, असे आरोप करत जे. जे. मधील ‘मार्ड’ संघटनेकडून केला गेला. रविवारपासून रुग्णालयातील ४०० निवासी डॉक्टरांनी रोजच्या अभ्यासक्रमाच्या व्याख्यानांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला मार्डच्या राज्यस्तरीय पातळीवरून पाठिंबा देण्यात आलेला नाही. नेत्रविभागातील एका रुग्णाला चुकीचे इंजेक् शन दिल्यामुळे तीन निवासी डॉक्टरांवर कारवाईचे संकेत देण्यात आले. कारवाई होऊ नये यासाठी या डॉक्टरांकडून हे आंदोलन होत आहे, असे डॉ. लहाने यांचे म्हणणे आहे. संबंधित रुग्णाच्या खालावलेल्या स्थितीशी निवासी डॉक्टरांचा संबंध नाही, असे जे. जे. मधील ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *