बेल्जियमसह अन्य तीन देशांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्यरात्री रवाना झाले असून, आज (बुधवार) सकाळी ते बेल्जियममध्ये दाखल झाले. बेल्जियमसह अमेरिका आणि सौदी अरेबिया या दोन देशांनाही ते भेट देणार आहेत.
ब्रुसेल्स विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आजपासून विमानतळावरील सेवा पूर्ववत होत आहे. ब्रुसेल्समध्ये भारत- युरोपियन युनियनच्या (ईयू) महत्त्वपूर्ण बैठकीस मौदी उपस्थित राहणार आहेत. दहशतवादाच्या मुकाबल्याबाबत ते बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मायकेल यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. ब्रुसेल्सवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा विषयही चर्चेत असेल, असे युरोप विभागाच्या संयुक्त सचिव नंदिनी सिंगला यांनी सांगितले. “ईयू‘च्या बैठकीत मुख्यत्वे मुक्त व्यापारावर चर्चा अपेक्षित आहे.
ब्रुसेल्सहून मोदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनला जातील. आण्विक सुरक्षा परिषदेच्या चौथ्या बैठकीस ते उपस्थित राहतील. 31 मार्च व एक एप्रिल रोजी ही बैठक होईल. या परिषदेत मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटणार काय, या प्रश्नाला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी थेट उत्तर दिलेले नाही. “आंतरराष्ट्रीय परिषदांत नेत्यांच्या भेटी होणे साहजिक असते,‘ असे ते म्हणाले.
अमेरिकेहून मोदी सौदी अरेबियाला जातील. राजे सलमान बीन अब्दुलाझिझ अल सौद यांच्या निमंत्रणानुसार मोदी रियाधला जात असून, तेथे ते दोन दिवस असतील.