मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत. महापौरांकडून नगरसेवकांना दिल्या जाणा-या विशेष निधी वाटपाच्या वादात स्नेहल आंबेकर यांनी थेट उद्धव ठाकरेंचं नाव घेतलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चेनंतरच महापौर विकास निधीचं वाटप केल्याचं धक्कादायक वक्तव्य महापौरांनी केलंय.
महापौरांच्या या खुलाशानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महापौरांना कॅमे-यासमोर यासंदर्भात विचारले असता मात्र त्यांनी सावध होत प्रतिक्रिया दिलीय. यापूर्वीच ५० कोटींच्या महापौर विकासनिधीच्या वाटपासाठी टक्केवारीचा आरोप विरोधकांनी केलाय. तसंच गेल्या वर्षी निधीवाटपाबाबत फोनवरील संभाषणाच्या स्टींग ऑपरेशननं महापौर चांगल्याच अडचणीतही सापडल्या होत्या. यामुळं मात्र नगरसेवकांना महापौरांकडून होणा-या विकास निधीच्या वाटपात खुद्द शिवसेना पक्षप्रमुखांकडून हस्तक्षेप होतोय का?, विरोधक करत असलेल्या टक्केवारीच्या आरोपाचे लागेबांधे थेट मातोश्रीशी जोडले गेलेले आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महापौरांचा 50 कोटी रूपयांचे निधी वाटप
शिवसेना – 35 कोटी
भाजप – 10 कोटी
काँग्रेस – 1.96 कोटी
राष्टृवादी – 2 कोटी
मनसे – 95 लाख
सपा – 50 लाख
महापौरांना टक्केवारी न दिल्यामुळं निधी कमी दिल्याचा मनसे, काँग्रेसने आरोप केलाय. तर मनसे नगरसेवक महापौरांचा निधी स्विकारणार नाही असं मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.