शेन वॉटसनचा क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन याने टी-२० वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे गुरुवारी मोहाली येथे जाहीर केले.

यापूर्वी गेल्यावर्षी सहा सप्टेंबर रोजी त्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती.

गेल्या वर्षी झालेल्या अ‍ॅशेस मालिकेतील कार्डिफ येथील पहिल्या सामन्यात वॉटसन खेळला होता. या सामन्यात दोन्ही डावांत अनुक्रमे ३० आणि १९ धावा त्याने केल्या होत्या. मात्र त्याला एकही बळी मिळवण्यात यश आले नव्हते. वॉटसनच्या त्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याला इतर सामन्यांसाठी मालिकेतून वगळण्यात आले होते. त्यावेळी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

वॉटसनने एकदिवसीय सामन्यांसह टी २० आणि आयपीएल स्पर्धांमध्येही चांगली खेळी केली आहे. यावर्षीच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याच्यासाठी ९.५ कोटी मोजले आहेत. तो एकदिवसीय क्रिकेटचा शेवटचा सामना सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्डसवर खेळला होता.

सध्या तो टी २० विश्वचषकात खेळत आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापुर्वीच त्याने क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले होते.

वॉटसनच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीचा आढावा…

एकदिवसीय
२४ मार्च २००२ मध्ये एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने पदार्पण केले. वॉटसनने १९० एकदिवसीय सामन्यात ४०.५४ च्या सरासरीने ५,७५७ धावा केल्या आहेत. यात ९ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. १८५ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी त्याने केली आहे. तर १६८ विकेटही त्याच्या खात्यात जमा आहेत.

कसोटी
२ जानेवारी २००५ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या वॉटसनने पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. वॉटसनने ५९ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ३५.१९ च्या सरासरीने ३,७३१ धावा केल्या आहेत. तर ७५ विकेटही त्याच्या खात्यात जमा आहेत. यात चार शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. यात १७६ धावांची खेळी कसोटी मधील सर्वोत्कृष्ट खेळी आहे. तर ३३.६८च्या सरासरीने ७५ विकेट घेतल्या आहेत.

टी २० विश्वचषक
२० फेब्रुवारी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वॉटसनने टी २० मध्ये पदार्पण केले. टी २० मधील ५६ सामन्यात २८ च्या सरासरीने त्याने १४०० धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. १२४ धावांची खेळी टी २० मधील सर्वोत्कृष्ट खेळी आहे. तर ४६ विकेटही त्याच्या खात्यात जमा आहेत.

आयपीएल विश्वचषक
आयपीएलच्या ७८ सामन्यात ३६.४९ च्या सरासरीने वॉटसनने २,३७२ धावा केल्या आहेत. तर ६१ विकेट घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *