राहुल महाजन पुन्हा बोहल्यावर, कोल्हापूरच्या अमृतासोबत लगीनगाठ

नेहमीच वादात असणारा राहुल महाजन तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. मूळची कोल्हापूरची असलेली मॉडेल अमृता मानेसोबत राहुल विवाहबंधनात अडकणार आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राहुलने त्याच्या लग्नाबद्दल सांगितले. अमृता आणि माझी आई एकमेकांना फार पूर्वीपासून ओळखतात. केरळमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमृता आणि माझी भेट झाली. त्याठिकाणी आमची ओळख झाली आणि थोड्याच दिवसांमध्ये आमची घट्ट मैत्री झाल्याचे राहुलने म्हटले. राहुल महाजनचे हे तिसरे लग्न आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर टेलिव्हिजनवरील ‘राहुल दुल्हनियाँ ले जायेंगे’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून डिंपी आणि राहुल महाजन यांचा विवाह झाला होता. यामध्ये १६ तरुणींमधून त्याने डिंपी गांगुलीची पत्नी म्हणून निवड केली होती. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकले नव्हते. काही दिवसांपूर्वीच डिंपीने दुबईस्थित उद्योजक रोहित रॉय यांच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर केवळ चार महिन्यांतच राहुलने मारहाण केल्याची तक्रार डिंपीने केली होती. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला आणि राहुलच्या आयुष्यात मॉडेल अमृता माने आली. आता लवकरच हे दोघे लगीनगाठ बांधणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *