रशियात विमान अपघातात ६२ ठार

रशियात झालेल्या विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ६२ प्रवाशांमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. दक्षिण रशियातील रोस्तोव्ह ऑन दोव्ह येथे दुबईहून येणा-या विमानाला अपघात झाला. या अपघातात ६२ जण मृत्यूमुखी पडले. यात ५५ प्रवाशांसह ७ विमान कर्मचा-यांचा समावेश आहे.

यातील दोन जण भारतीय आहेत. अंजू कथिर्वेल अय्यप्पन आणि मोहन शाम अशी त्यांची नावे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी सांगितले.

या विमानात अन्य ४४ रशियन, ८ युक्रेनियन आणि उझबेकिस्तानचा एक प्रवासी असल्याचे समजते.

दुबईहून ५५ प्रवाशांना घेऊन रोस्तोव्हला आलेले फ्लायदुबई बोईंग ७३७ हे विमान येथील विमानतळावर उतरत असताना अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्वरीत आग लागली आणि ते आगीच्या भक्षस्थानी पडले.

हा अपघात आंतरराष्ट्रीय वेळेनुसार रात्री १२ वाजून ५० मिनिटांनी झाल्याचे स्थानिक आपत्कालीन मंत्रालयाचे प्रवक्ते मरिना कोस्तओकोवा यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय वेळेनुसार रात्री २ वाजता आगीवर नियंत्रण मिळवल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *