महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली.
भुजबळ यांची ११ तासांपासून सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. भुजबळ दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील होते. यावेळी ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आरोपपत्र दाखल केल्यानंतर भुजबळ यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर मुलगा आमदार पंकज यांना १० फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दोघांचे पासपोर्टही ताब्यात घेण्यात आले आहेत.
आपल्या वकिलासोबत ईडीच्या कार्यालयात हजर झालेल्या भुजबळांनी आपल्या सर्व बँक खात्यांची कागदपत्रे तसेच त्यांनी खरेदी केलेल्या विविध मालमत्तांची कागदपत्रे सोबत आणली होती. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली.
ईडीच्या कार्यालयात प्रवेश करण्याआधी छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माझा राजकीय सूड घेतला जात असून मी त्याचा बळी ठरलो असल्याचे सांगितले. चौकशी करणा-या यंत्रणेला मी सहकार्य करीन, असे ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे २०० हून अधिक कार्यकर्ते भुजबळांना पाठिंबा देण्यासाठी ईडी कार्यालयाबाहेर जमा झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ईडीच्या कार्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.