आधारमार्फत खतावरील अनुदान बँक खात्यात

आधारला वैधानिक आधार देण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर केल्यानंतर खतावरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना लवकरच येत आहे, असे अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले.

खते आणि अन्नावरील अनुदानाच्या संदर्भात हे अनुदानही येईल. अखेरच्या लाभार्थीपर्यंत विनाअडथळा आणि संकटे न येता सावकाश आणि कसून चौकशी करुनच हे अनुदान पोहचवले जाईल, असे ते म्हणाले. सध्या एलपीजी अनुदानासाठी तसेच इतर काही सरकारी योजनांसाठी आधार कार्ड वापरण्यात येत आहे.

आधार कार्डमुळे कारभार व प्रशासनात मोठय़ा प्रमाणावर कार्यक्षमता येणार आहे. खतावरील अनुदानाबाबत चर्चा झाली असून लवकरच ते आधारमार्फत देण्यात येईल, असे दास म्हणाले. अर्थसंकल्पाची घोषणा झाल्यानंतर ११ दिवसांतच लोकसभेत विधेयक मंजूर झाले, ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे विधेयक म्हणजे क्रांतिकारी असल्याचे सांगून दास म्हणाले की, त्यामुळे खरोखर पात्र लाभार्थीपर्यंतच अनुदान जाईल आणि गळती व पारेषणातील नुकसान टळले जाईल.

थेट बँक खात्यात अनुदान जमा करणे आणि आधार कार्ड हे जोडले जातील. कारण त्याला आता प्रबळ असा वैधानिक आधार आहे. पूर्वी हे नव्हते, असे दास यानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *