महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचले आहेत. सक्तवसुली संचालनालय (ईडी) आज त्यांची चौकशी करणार आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आरोपपत्र दाखल केल्यानंतर छगन भुजबळ यांच्या चौकशीसाठी समन्स काढले होते.
या समन्सनुसार भुजबळ यांना सोमवारी सक्तवसुली संचालनालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार होते. त्यानुसार छगन भुजबळ सोमवारी 11.30 वाजता सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचले असून त्यांची चौकशी सुरु आहे. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालय चौकशी करीत आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर मुलगा आमदार पंकज यांना १० फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दोघांचे पासपोर्टही ताब्यात घेण्यात आले आहेत.