साक्षीदारावर दबावासाठी पुण्यात दांडेकर पूल परिसरात दोन गटांत दगडफेक

खुनाच्या गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने बुधवारी रात्री पुण्यातील दांडेकर पूल परिसरात दोन गटांनी परस्परांवर दगडफेक केल्याचा प्रकार घडला. रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. या दगडफेकीमध्ये काही दुचाकी आणि टेम्पोचे नुकसान झाले असून, एका इमारतीतील घराच्या काचाही फोडण्यात आल्या. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अकराच्या सुमारास दांडेकर पूल परिसरात दगडफेक सुरू असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली. त्यानंतर तातडीने पोलीसांच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. स.न. १३२ साने गुरुजी शाळा आणि स.न. १३३ दांडेकर पूल या परिसरातील दोन गटांमध्ये परस्परांविरोधात दगडफेक सुरू होती. गणेश कांबळे या युवकाच्या खुनामध्ये साक्षीदारांवर दबाव टाकण्यासाठी एका गटातील तरुणांकडून साने गुरुजी शाळेजवळ येऊन दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱया गटातील तरुणांनी नंतर स.न्. १३३ मधील लक्ष्मी नारायण टॉवर येथे जाऊन तेथील गाड्यांवर दगडफेक केली. यामध्ये एका टेम्पोचे आणि दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले. या तरुणांनी टॉवरमधील घरांच्याही काचा फोडल्या. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दत्तवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *