वास्को-बिर्ला येथील बिट्स पिलानीजवळ शुक्रवारी दुपारी एका स्कूल बसला अपघात होऊन बसमधील १५ विद्यार्थ्यांना दुखापत झाली.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिर्ला येथील ‘जी माऊंट लिटल स्कूल’च्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस बिटस पिलानी कॉलेजजवळ आली असता विरूद्ध दिशेने येत असलेल्या एका मालवाहू ट्रकची जोरदार धडक बसला बसली.
बसमध्ये त्या वेळी इयत्ता ३ री ते ५ वी या वर्गातील ४५ छोटी मुले होती. ट्रकच्या धडकेने त्यातील १५ मुलांना किरकोळ मार लागला.
त्यातील सात विद्यार्थ्यांना अधिक दुखापत झाल्याने नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले, वैद्यकीय उपचारानंतर संध्याकाळी सर्व मुलांना घरी पाठवण्यात आले. या अपघातप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.