ताडोबात गवत खाणारा वाघ!

ताडोबात गवत खाणारा वाघ!

वाघांचे जग नेमके असते तरी कसे हे प्रत्येकालाच पाहण्याची, जाणून घेण्याची उत्सुकता असते. हेच आता ‘लॅण्ड ऑफ टायगर’च्या माध्यमातून व्याघ्रप्रेमींना समजून घेता येणार आहे. बीएनएचएस आयोजित या प्रदर्शनाच्या माध्यमातून ताडोबा-अंधारी व मेळघाटातल्या जीवसृष्टीचा खजिना व्याघ्रप्रेमींसाठी खुला झाला आहे.

बीएनएचएसचे नागपूर विभागाचे सहाय्यक संचालक संजय करकरे यांनी गेल्या १० वर्षांमध्ये आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेले हे जग मुंबईकरांसमोर उलगडले आहे. या प्रदर्शनात विदर्भातील ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा व बोर या पाच व्याघ्रप्रकल्पील निसर्ग पाहायला मिळतो. येथील वनस्पती व प्राणीसृष्टीचे दर्शन या फोटोंमधून घडते. जंगलाचे विविध ऋतूंमधील रूप, जंगलातील सकाळ, संध्याकाळचे रंग या फोटोंच्या माध्यमातून पाहायला मिळतात. करकरे यांनी विविध वेळी पाणवठ्यावर येणारे प्राणी टिपले आहेत. पाण्याच्या कुंडात खेळणारी वाघीण व तिचा बछडा हा फोटो तर सर्वांनाच आवडेल असाच आहे. जय-विरू या वाघ भावंडांची जोडी, एकाक्ष वाघ, एकाच पाणवठ्यावर पाणी पिणारा वाघ व त्याच्या जवळच असलेला हरणांचा कळप अशी वाघाची विविध रूपे या प्रदर्शनात उलगडतात. त्याशिवाय चक्क गवत खाणाऱ्या वाघाचा फोटोही यात आहे. निसर्ग आपल्याला समजतो, दिसतो त्या पलीकडे किती व्यापक आहे याचीच जाणीव हा फोटो पाहताना होते.

दिवसा आढळून येणाऱ्या घुबडाची प्रजाती नष्ट झाली असा समज सुमारे ११३ वर्षे होता. मात्र, हे घुबड पुन्हा १९९५ मध्ये आढळले. त्याचाही फोटो या प्रदर्शनात आहे. ताडोबा-अंधारी परिसरातील ७९ गावांमध्ये बांबू हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पाचा हा अविभाज्य घटक आहे. म्हणूनच बांबूपासून तयार करणाऱ्या या वस्तूंचीही माहिती या प्रदर्शनातून देण्यात आली आहे. हे प्रदर्शन ५ जूनपर्यंत बीएनएचएसच्या हॉर्नबिल हाऊस सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *