पाचवड (ता. वाई) येथील गोपाळ समाजाच्या जात पंचायतीने एका व्यक्तीला व त्याच्या तेरा वर्षीय मुलीला मारहाण केल्याचे उघडकीस आले असून, भुईंज पोलिसांनी आज (शुक्रवार) पाचजणांना अटक केली. शिवाजी पवार, दत्तू चव्हाण, राजाराम पवार, जिवा दिनकर पवार, सर्जेराव चव्हाण अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
यासंदर्भात पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देसमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की काही लोक एक मोबाईल व्हिडिओ चित्रफित घेऊन गुरुवारी भुईंज पोलिस ठाण्यात आले होते. पाचवड येथील गोपाळ समाजाच्या जात पंचायतीमध्ये एक व्यक्ती एका लहान मुलीस आणि एका पुरुषास काठीने मारहाण करताना त्या चित्रफितीत दिसत होते. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मारहाण करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध भुईंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासात असे निष्पन्न झाले, की सदर मारहाणीची घटना ही पाचवड येथील गोपाळ समाजाच्या जात पंचायतीत घडली आहे.
मारहाण करण्यात आलेल्या मुलीवर तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या कारणावरून गोपाळ समाजाने जात पंचायत भरवून त्यांना पंचांनी मारहाणीची शिक्षा केल्याचे समोर आले. ही घटना घडल्यानंतर संबंधित मुलगी व तिचा वडील निघून गेले होते. जात पंचायतीचे पंचही निघून गेले होते. पोलिसांनी संबंधित मुलगी व तिच्या वडिलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
जात पंचायतीतील पंचांनी आपल्याला मारहाण केल्याची कबुली त्यांनी दिली. जात पंचायतीने शिक्षा म्हणून संबंधित पित्यास पाच हजार रुपये आणि मुलीस तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, असेही चौकशीत पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना मारहाण करणारे पंच शिवाजी पवार, दत्तू चव्हाण, राजाराम पवार, जिवा दिनकर पवार, सर्जेराव चव्हाण यांना अटक केली. मुलीच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.