शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पदवीच्या आरोपानंतर आता पुन्हा नवीन आरोपामुळे अडचणीत आले असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तावडे यांनी एका खासगी कंपनीचे संचालकपद लपविले असताना, या कंपनीच्या संचालक मित्राला थेट विश्वकोश निर्मिती महामंडळाचे अध्यक्षपद दिल्याचा आरोप कॉंग्रेसने गुरुवारी पुराव्यासह सादर केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत तावडे यांचे खासगी कंपनीतील प्रकरण उजेडात आणले. श्री मल्टिमीडिया व्हिजन लिमिटेड, या कंपनीचे विनोद तावडे हे संचालक असल्याची कागदपत्रे त्यांनी सादर केली. याच कंपनीचे दुसरे संचालक दिलीप करंबेळकर असून, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी देखील काही काळ या कंपनीचे संचालक होते. गडकरी यांच्या पूर्ती समूहाचे अध्यक्ष बोराटकर देखील या कंपनीचे संचालक होते.
करंबेळकर यांना तावडे यांच्या सांस्कृतिक व मराठी भाषा विभागाने थेट विश्वकोश निर्मिती महामंडळाचे अध्यक्षपद बहाल केल्याची टीका चव्हाण यांनी केली. करंबेळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांची नेमणूक करताना राज्यभरातील इतर सक्षम व्यक्तींची नावे जाणूनबुजून मागे ठेवण्यात आली. तर, तावडे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी यांनी (ओएसडी) सरकारच्या सचिवांसोबत चर्चा करून करंबेळकर यांची निवड केल्याच्या गंभीर घटनेचा पुरावा चव्हाण यांनी दिला.
सध्या मंत्रालयात सरकारी सेवेत नसलेल्या; पण नागपूरशी संबंधित असलेल्या व्यक्तींची ओएसडी म्हणून नेमणूक करण्यात आलेली असून, या सरकारचे निर्णय ओएसडी घेतातच कसे? असा सवाल केला. सरकारी कायदे आणि नियमांची पायमल्ली करत हे खासगी अधिकारी सरकार चालवत असल्याची बाब गंभीर असून, याला विनोद तावडे हे जबाबदार असल्याचे चव्हाण म्हणाले.
निवडणूक आयोगाची फसवणूक
तावडे यांना श्री मल्टिमीडिया व्हिजन लिमिटेड या कंपनीतून मिळालेला नफा तावडे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेला नाही, त्यामुळे निवडणूक आयोगाची त्यांनी फसवणूक केली आहे. त्यासोबतच कंपनीचे संचालक करंबेळकर यांना थेट विश्वकोश निर्मिती महामंडळाचे अध्यक्षपद बहाल करत घटनेच्या शपथेचाही भंग केला आहे. मंत्रिपदाचा वापर त्यांनी स्वहिताच्या कारणासाठी केल्याने ते प्रथमदर्शनी दोषी असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिपदावरून पदच्युत करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.