भारतीय वंशाच्या सहा वैज्ञानिकांना पुरस्कार

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी निवड केलेल्या युवा वैज्ञानिक व अभियंत्यांसाठी असलेल्या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड केलेल्या १०६ वैज्ञानिकांपैकी ६ जण भारतीय वंशाचे आहेत. वॉशिंग्टन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच होणार आहे.

परडय़ू विद्यापीठाचे संगणक अभियांत्रिकीचे प्राध्यापक मिलिंद कुलकर्णी यांचा समावेश आहे. त्यांचे संशोधन संगणक आज्ञावलीच्या भाषांशी निगडीत आहे. हार्वर्ड विद्यापीठात मूळपेशी क्षेत्रात कार्यरत असलेले किरण मसुनुरू यांचे संशोधन हृदयाच्या जनुकीय व चयापचय क्रियांशी निगडीत आहे.

मॉलिक्युलर फिजिऑलॉजी अ‍ॅण्ड बायोफिजिक्स व्हॅडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे सचिन पटेल यांनाही गौरवण्यात येणार आहे. त्यांनी न्युरॉनमधील कॅनाबिनॉइडचे मेंदूतील कार्य समजण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे मानसिक रोगांवर उपचार शक्य आहेत. नासाच्या ग्लेन रिसर्च सेंटरचे विक्रम श्याम यांचे संशोधन इंजिन फ्लो फिजिक्स, बायोमिमेटिक याच्याशी संबंधित आहे.

पेनसिल्वानिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले राहुल मंघाराम यांनी ऊर्जाक्षम इमारती, स्वयंचलित यंत्रे व औद्योगिक बिनतारी यंत्रणा यावर संशोधन केले. तर वॉशिंग्टन विद्यापीठातील संगणक विज्ञान व अभियांत्रिकीचे प्राध्यापक श्वेताक पटेल यांना संगणक-मानव संबंध, संवेदक नियंत्रित प्रणाली यासाठी गौरवण्यात येत आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कारकिर्दीत १९९६ मध्ये हे पुरस्कार सुरू करण्यात आले. या तरुण वैज्ञानिकांची कामगिरी कौतुकास्पद असून हवामान बदल, आरोग्य, मानवी कल्याण या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. तरुण वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात. त्यात नव प्रवर्तनात्मक शोधांना प्राधान्य दिले जाते. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते, असे व्हाईट हाऊसच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *