लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत असतांना आणखी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. कसा-याकडे जाणा-या लोकलमधून प्रवास करणा-या तरूणाचा तोल जाऊन तो खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी संध्याकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
रमजान अली (२४) असे या तरुणाचे नाव आहे. रमजान हा मुळचा मध्यप्रदेशमधील रहिवासी आहे.
कल्याणहून कसा-याकडे जाणारी सात वाजून ३० मिनिटाची लोकल तानशेत केबीन सोडून निघाली. त्यावेळी रमजानचा हा तोल जाऊन तो खाली पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
याबाबत कसारा जीआरपीला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कळविण्यात आले, अशी माहिती जीआरपी जाधव यांनी दिली. घटनेची महिती मिळता पोलीस घटनास्थळी धाव घेतली. रमजानला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.