७२ तासांच्या जम्बोब्लॉक कोंडीतून हार्बरच्या प्रवाशांची सुटका होते ना होते तोच पुन्हा सोमवारी सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सीएसटीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बरमार्गावरील गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
या बिघाडामुळे वाशी, पनवेल आणि अंधेरीच्या दिशेने जाणारी आणि येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन प्रवाशांच्या कामावर जायच्यावेळी हा तांत्रिक बिघाड उदभवल्याने नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत. मागच्या काही दिवसात हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक अनेकदा विस्कळीत झाली आहे.
हार्बरवरील बारा डब्यांच्या लोकलसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कामांसाठी १९ फेब्रुवारीपासून ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. हे काम अखेर २१ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात आल्याने हार्बरवासीयांची अखेर ७२ तासांच्या ब्लॉककोंडीतून सुटका झाली होती.
सीएसटीत पूर्ण केलेल्या सर्व कामानंतर आठवड्यातील पहिला कामाचा दिवस कोणताही बिघाड न होता व्यवस्थित जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र आठवडयाच्या पहिल्याच हार्बरच्या प्रवाशांना मनस्तापाच्या अनुभवातून जावे लागत आहे.