दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेल्या उमर खालीदच्या वडीलांनी आपल्याला धमकीचा फोन आल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे.
जेएनयूमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या सभेवेळी भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आलेला आहे. यावेळी उमर खालीदही उपस्थित असल्याचा आरोप होत असून, पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे. तसेच त्याच्यावरही देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी उमरचे वडील सईद कासीम रसूल यांनी यापूर्वीच माझ्या मुलावर चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. आता त्यांनी आपल्याला धमकीचा फोन आल्याची तक्रार दाखल केली आहे. तुमच्या मुलाने देश सोडला नाही, तर त्याला ठार मारु, अशी धमकी देण्यात आल्याचे सईद यांनी म्हटले आहे. उमरच्या वडीलांनी कुटुंबासाठी पोलिस संरक्षणाचीही मागणी केली आहे. उमरच्या छोट्या बहिणीलाही सोशल मिडीयातून धमक्या देण्यात येत आहेत.