मूलभूत समस्या सोडवता येत नसतील तर खुर्च्या खाली करा

उल्हासनगरवासीयांनी शिवसेना-भाजपाच्या हाती सत्ता दिली आहे, त्यामुळे नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवणे, हे त्यांचे काम असतानाही ही मंडळी मात्र साधा पाणीपुरवठाही व्यवस्थित करू शकत नसतील तर खुर्च्या सोडा आणि निवडणुकीला सामोरे जा, अशा शब्दांत ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष, आमदार नितेश राणे यांनी उल्हासनगरचे सत्ताधारी असलेल्या शिवसेना-भाजपाला खडे बोल सुनावले.

मागील महिन्याभरापासून उल्हासनगरातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘स्वाभिमान संघटनेने आंदोलन उभारले असून नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी जिल्हा संघटक रोहित साळवे यांनी हेल्पलाईनही सुरू केली होती. यानंतर ‘स्वाभिमान’कडे पाणीपुरवठय़ाबाबत प्रचंड तक्रारी आल्या होत्या. यापैकी ५० प्रमुख तक्रारींचे निवेदन ‘स्वाभिमान’ने महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांना देऊन या समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली होती.

मात्र तरीही या समस्या ‘जैसे थे’ असल्याने बुधवारी ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या वेळी मोर्चाला संबोधित करताना ‘उल्हासनगर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठय़ात गरीब व श्रीमंत असा भेदभाव केला जात आहे. यामुळे गरिबांच्या वस्त्यांमध्ये मोठी पाणीटंचाई निर्माण झाली असून टँकरमाफियाही गरीब वस्त्यांकडे दुर्लक्ष करून श्रीमंतांच्या इशा-यावर नाचत आहेत, त्यांनी जर यापुढे असेच वर्तन केले, तर शहरातील एकही टँकर पुन्हा परत जाऊ शकणार नाही. आम्ही मुंबईत टँकरराज उद्ध्वस्त केले असून उल्हासनगरातील टँकरमाफियानीही हे लक्षात घ्यावे’, असा खणखणीत इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

या मोर्चात ‘स्वाभिमान’चे महाराष्ट्र संघटक सचिन सातपुते, जिल्हा संघटक रोहित साळवे, रेवण शिंदे, रविंद्र घाडगे, विजय गायकवाड, शेखर ठोसर, मंगेश हिवराळे, सुशांत कांबळे, प्रशांत चंदनशिवे, सागर गजलमल, सुरज म्हस्के, काँग्रेस नगरसेविका अंजली साळवे यांच्यासह शेकडो सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *