सोलापूर- होटगी मार्गावर रेल्वेच्या धडकेत पाच अनोळखी इसमांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली़ ठार झालेले पाचही जण कर्नाटक राज्यातील असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़
घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग व विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व मृतदेह शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
शहरातील आसरा पुलाच्या परिसरातील सावतामाळी मंदिराच्या पाठीमागे रूळाजवळ पाच जण मृत झाल्याची खबर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रेल्वेतील कर्मचाऱ्याने सोलापूर रेल्वे नियंत्रण कक्षाला कळविली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना पाचही मृतदेह अस्ताव्यस्त पडलेले दिसले. एका मृताच्या खिशात डॉक्टरकडे घेतलेल्या उपचाराची चिठ्ठी सापडली. चिठ्ठीवरुन त्याचे नाव परशुराम कलोळे (रा. कलोळे, ता. जमखंडी, जि. बागलकोट, कर्नाटक) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले़ अन्य ४ जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. सर्व मृतदेहांचे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. (प्रतिनिधी)
कर्नाटक पोलिसांशी संपर्क
सोलापूर पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला असून त्यामुळे मृतदेहांची लवकर ओळख पटविता येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजीव भोसले यांनी सांगितले.
डॉक्टरांची चिठ्ठी : एका मृत इसमाच्या खिशात पुण्यातील भुगाव परिसरातील डॉ. इनामदार यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याची चिठ्ठी सापडली़ डॉ़ इनामदार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी दररोज शेकडो रुग्ण माझ्याकडे येतात, मी निश्चितपणे काही सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.