महात्मा गांधी यांची हत्या हिंदुत्ववादी विचारसरणीतून झाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा व वि. दा. सावरकर यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला होता, असा खळबळजनक आरोप महात्मा गांधी यांचे पणतू व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी केला. तसेच, हे मी म्हणत नसून यासंदर्भात कागदोपत्री पुरावे उपलब्ध असल्याचा खुलासाही त्यांनी केला.
युवा जागर व धनवटे नॅशनल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ‘गांधी हत्येमागील षड्यंत्राचे सत्य’ विषयावर तुषार गांधी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हिंदुत्ववाद्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केल्याचे ठासून सांगितले. नाथुराम गोडसेसह अन्य आरोपी या कटातील प्यादे होते. गांधीजींची हत्या करण्यासाठी गोडसेला वि. दा. सावरकर यांच्याकडून पे्ररणा तर, आरएसएस व हिंदू महासभेकडून शक्ती मिळाली होती. हिंदुत्ववाद्यांच्या मदतीशिवाय गोडसे एवढे मोठे कृत्य करूच शकत नव्हता. देशाची फाळणी, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देणे, मुस्लिमधार्जिणे धोरण, भगतसिंगची फाशी टाळण्यासाठी प्रयत्न करण्यास नकार देणे इत्यादी कारणांमुळे गांधीजींची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, ही सर्व कारणे असत्य आहेत. या बाबी घडण्यापूर्वीपासूनच गांधीजींच्या हत्येचे प्रयत्न सुरू होते. गोडसेने गोळ्या झाडण्यापूर्वी पाचवेळ गांधीजींवर हल्ला करण्यात आला होता. महात्मा गांधी सत्यासाठी सतत आग्रही रहात होते. यामुळे हिंदुत्ववादी संघटनांना ते नकोसे झाले होते. त्यांच्या हत्येमागे हेच एक कारण आहे, असा दावा तुषार गांधी यांनी केला.
आपले दुर्दैव आहे की, गांधीवादी लोकांनी असत्याचा प्रसार केला जात असताना त्याचा विरोध केला नाही. परिणामी गांधीजींच्या हत्येचे समर्थन करण्यासाठी सांगितली जाणारी देशभक्तीपर कारणे समाजमनात पक्की होत आहेत. गोडसेचे मंदिर बांधणे व गांधीजींच्या हत्येसाठी वापरलेल्या बंदुकीची पूजा करणे यातूनच घडत आहे. हिंदू महासभा व आरएसएसचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. परंतु, आज सर्वांधिक देशभक्ती त्यांच्याकडूनच दाखविली जाते, असे तुषार गांधी यांनी सांगितले.
१९३४ मध्ये पुणे येथील टाऊन हॉलमध्ये गांधीजींची गाडी समजून दुसऱ्याच गाडीवर हातगोळा फेकण्यात आला होता. १९४६ मध्ये गांधीजींवर तीनदा हल्ले झालेत. पाचवा हल्ला गांधीजींच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वी झाला होता. गोडसेने गांधीजींची हत्या केली असली तरी त्यांच्या रक्ताचे डाग आरएसएस, हिंदू महासभा व वि. दा. सावरकर यांच्या अंगालाही लागले आहेत. कपूर कमिशनच्या चौकशीतून त्यांचा गांधीजींच्या हत्येत सहभाग असल्याचे पुढे आले आहे. गांधीजींच्या हत्येसाठी बडगेच्या बयानावरून गोडसे व इतरांना शिक्षा झाली. परंतु, सावरकरांच्या बाबतीत बडगेचे बयान संशयास्पद ठरविण्यात आले. यामुळे सावरकरांना शिक्षा झाली नाही. परंतु, ते निर्दोष असते तर, त्यांचे नाव आरोपींमध्ये आले नसते असे मत तुषार गांधी यांनी व्यक्त केले. गांधीजींना देशाची फाळणी नको होती. नेहरू व पटेल यांनी फाळणीला मान्यता दिल्यामुळे ते हतबल झाले होते. पाकिस्तानला फाळणीच्या करारानुसार ५५ कोटी रुपये देणे होते पण, त्यावेळी भारत शासनाने शरणार्थींच्या प्रश्नावरून ही रक्कम देण्यास नकार दिला होता. ही कृती वचनभंग करणारी होती.
व्याख्यान धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात झाले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार अध्यक्षस्थानी तर, राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत, अनिल देशमुख, माजी खासदार गेव्ह आवारी, सामाजिक कार्यकर्ते अनंतराव घारड, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, साहित्यिक चंद्रकांत वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. कोमल ठाकरे यांनी संचालन, युवा जागरचे अध्यक्ष अतुल लोंढे यांनी प्रास्ताविक तर, प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांनी आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)
तुषार गांधी झाले भावूक
व्याख्यानाचा शेवट करताना तुषार गांधी भावूक झाले होते. गांधीजींचे महात्म्य डावलून गोडसेचे उदात्तीकरण होत असल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली. जीवनभर गांधीजींची पूजा व त्यांच्या विचारांचा प्रचार करेल, असे सांगितले.
व्याख्यानाला मराठीतून सुरुवात
गांधी यांनी व्याख्यानाला मराठीतून सुरुवात केली. यापूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे व्याख्यान रद्द करावे लागल्याने त्यांनी श्रोत्यांची क्षमा मागितली. यानंतर मराठीत अधिक बोलू शकत नसल्याचे सांगून श्रोत्यांच्या परवानगीने पुढील व्याख्यान हिंदीतून दिले.