झिकाचे अमेरिका आणि युरोपवर सावट

आफ्रिका आणि आशियामध्ये आढळणाऱ्या झिका या तापाचा प्रसार दक्षिण अमेरिकेपाठोपाठ आता उत्तर अमेरिकेत होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्येही झिकाचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण पाश्चिमात्य जगतात चिंता व्यक्त केली जात आहे. ब्राझिल पुरते मर्यादित असणाऱ्या झिकाने दक्षिण आफ्रिकेस वेगाने कवेत घेतले आणि आता त्याचा प्रसार इतर देशांमध्ये होऊ लागला आहे. कॅनडा आणि चिलीमध्ये मात्र झिकाचे विषाणू वाहून नेणारे डास आढळत नसल्याने तेथे झिकाचे रुग्ण आढळलेले नाहीत.

झिका म्हणजे काय?

झिका हे नाव युगांडामधील वनांच्या प्रदेशावरुन आलेले आहे. झिका विषाणू सर्वात प्रथम १९४७ साली युगांडात आढळून आला. त्यानंतर १९६८मध्ये नायजेरियामध्ये तो दिसून आला. त्यानंतर आफ्रिकेत सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन, इजिप्त, गॅबन, सिएरा लिओन, टांझानिया, युगांडा तर आसियामध्ये भारत, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, थायलंड या देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळून आले. मात्र आता खरी काळजी दक्षिण अमेरिकेत वेगाने प्रसारित झाल्यामुळे वाढीस लागली आहे. ब्राझीलमधील उद्रेक बार्बाडोस, कोलंबिया, इक्वेडोर, एल साल्वाडोर, फ्रेंच गयाना, ग्वाटेमाला, गयाना, हैती, मेक्सीको, पनामा, प्युएर्टो रिको, सुरिनाम असा मध्य अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे.

झिकाचा डास आणि ताप: झिका तापाचे विषाणू एडिस इजिप्ती या डासामार्फत पसरवले जातात. त्यामुळे या डास चावलेल्या व्यक्तींच्या शरीरात हे विषाणू जाऊन त्यांना ताप, डोळे येणे, सांधे दुखणे तसेच भुरळ येणे अशा तक्रारी संभवतात. झिकाचा सर्वात मोठा धोका हा गर्भवतींना आहे. कारण झिकाचे विषाणू चावलेल्या महिलांच्या मुलांना जन्मत:च मायक्रोसिफली झाल्याचे आढळून आले आहे. तर प्रौढ व्यक्तींमध्ये तात्पुरता अर्धांग होऊ शकतो.

उपाय: झिकावर दुर्देवाने अद्याप कोणतेही औषध किंवा लस शोधण्यात आलेली नाही. त्यामुळेच या रोगाची भीती पाश्चिमात्य देशांमध्ये वाढली आहे. गलियन बार सिंड्रोम या रोगात तात्पुरत़्या अर्धांगास दूर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा काही ठिकाणी वापर केला जात आहे. ब्राझीलमध्ये भेटी देऊन झिकाची सँपल्स गोळा करण्याची तयारी सध्या सुुरु करण्यात आलेली आहे. काही तज्ज्ञांनी झिकाला इबोला इतके काही घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. झिकाशी सामना करण्यासाठी त्याच्या डासांना मारणे आणि त्यांना लांब ठेवणे हा एकमेव उपाय सध्या आहे. साचलेल्या पाण्यात हे डास उपजू नयेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. घरामध्ये आणि बाहेरही डास होऊ नयेत याची खबरदारी अमेरिकेत घेतली जात आहे. त्याचप्रमाणे लांब बाह्यांचे व पूर्ण कपडे घालण्याची सूचना करण्यात आलेली आहे.

मायक्रोसिफली: मायक्रोसिफली या आजारामध्ये बाळाच्या डोक्याचा आकार नेहमीपेक्षा फारच लहान असतो. बाळाच्या मेंदूची वाढ सामान्य वेगाने न झाल्यामुळे हे संऊवते. ब्राझील, व्हेनेझुएलामध्ये मायक्रोसिफली झिकामुळे वाढीस लागल्याने सर्व जगात अचानक खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *