ऑलिंपिकपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि प्रसिद्ध महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. अव्वल नेमबाजी दीपिका कुमारीची ‘पद्मश्री’साठी निवड झाली आहे.
२०१५ वर्ष सायना, सानिया आणि दीपिकाने गाजवले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणा-या सायनाने प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना रौप्यपदक मिळवले.
त्याशिवाय इंडिया ओपन सुपरसीरिज आणि सय्यद मोदी ग्राँप्रि गोल्ड स्पर्धाही जिंकली. सानियाने महिला दुहेरीत नवा विक्रम रचला. स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसससह ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन ग्रँडस्लॅमसह नऊ जेतेपदे पटकावली.
तसेच जागतिक दुहेरी महिला क्रमवारीत (रँकिंग) अव्वल स्थान मिळवले. दीपिकाने तिरंदाजी वर्ल्ड कप फायनल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. तसेच वर्ल्डकप (दुसरा स्तर) आणि आशियाई सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले.
सायनाला ‘पद्मभूषण’ मिळाल्याचा आनंद, पण..
‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सायना नेहवालने आनंद व्यक्त केला. मात्र गेल्या वर्षी दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.
‘‘पद्मभूषण पुरस्कार मिळणे, हा माझा मोठा सन्मान समजते. त्याबद्दल क्रीडा मंत्रालयाची मी आभारी आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने मला आश्चर्य वाटले. तशी कुणकुणही नव्हती. तसेच कुठेही छापून आले नव्हते.
२५व्या वर्षी हा पुरस्कार मिळेल, असे मला कधीच वाटले नव्हते. गेल्या वर्षीच्या माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीच्या महिला एकेरीत मी अव्वल स्थानी झेप घेतली. सध्या दुस-या स्थानी आहे. ‘पद्मभूषण’ पुरस्कारामुळे मला अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा मिळाली आहे,’’ असे सायना म्हणाली.
गेल्या वर्षी सायनासह दोन वेळचा ऑलिंपिकपदक विजेता सुशील कुमारमध्ये ‘पद्मभूषण’साठी चुरस होती. त्यात सुशीलला प्राधान्य देण्यात आले. गेल्या वर्षी पुरस्कारासाठी विचार न झाल्याने सायनाने नाराजी व्यक्त केली. त्याबरारोबरच ‘झाले गेले विसरून’ गेल्याचेही तिने म्हटले.
सायनाला २०१०मध्ये ‘पद्मश्री’ आणि २००९मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे. या शिवाय २०१०मध्ये क्रीडा पुरस्कारांमधील सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने तिला गौरवण्यात आले आहे.
२००९ – अर्जुन पुरस्कार
२०१० – पद्मश्री पुरस्कार
२००९-१० – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
२०१६ – पद्मभूषण पुरस्कार
‘अधिक चांगली कामगिरी करण्याचे बळ मिळाले’
‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याने भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्याचे बळ मिळाले, असे टेनिसपटू सानिया मिर्झाने म्हटले.
‘‘पद्मभूषण पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचा आनंद अवर्णनीय आहे. या पुरस्कारामुळे माझा आत्मविश्वास अधिक उंचावला आहे. तसेच भविष्यात अधिक चांगल्या कामगिरीची प्रेरणा मिळाली आहे. यापुढे सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना देशाचे नाव अधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेन,’’ असे सानियाने मेलबर्नहून सांगितले.
२९ वर्षीय सानिया सध्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळत आहे. सहकारी स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिससह तिने महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
सायना नेहवालप्रमाणे सायनाला यापूर्वी ‘पद्मश्री’ आणि ‘अर्जुन’ पुरस्कारासह ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
‘पुरस्कार मिळाल्याचा सुखद धक्का’
यंदा‘पद्मश्री’ पुरस्कार मिळेल, असे वाटले नव्हते. त्यामुळे पुरस्कार मिळाल्याचा सुखद धक्का बसला, असे २१ वर्षीय तिरंदाज दीपिका कुमारीने म्हटले.
‘‘मला ‘पद्मश्री’ जाहीर झाला, यावर विश्वासच बसत नाही. पद्म पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघ. तसेच त्यासाठी कामगिरीत सातत्य ठेव, असे माझ्या मित्राने चार-पाच दिवसांपूर्वी मला सांगितले.
दोन दिवसांपूर्वी फेडरेशनच्या पदाधिका-याने मला फोन केला. ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी माझे नामांकन झाल्याचे त्यांनी मला सांगितले. मात्र ‘नॉमिनेशन’ असल्याने मी त्यांचे म्हणणे तितके गांभीर्याने घेतले नाही.
परंतु, सोमवारी सकाळी ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी माझ्या नावाची घोषणा झाल्याने आनंदाला पारावार उरलेला नाही. त्यानंतर अभिनंदन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठीचे शेकडो ‘कॉल्स’ आले.
दीपिकाने ‘पद्मश्री’ पुरस्कार आईवडिलांसह प्रशिक्षकांना समर्पित केला आहे. ‘‘हा पुरस्कार मी आईवडिलांसह प्रशिक्षक धर्मेद्र तिवारी आणि पूर्णिमा महातो यांना समर्पित करते. २०१२मध्ये अर्जुन पुरस्कार स्वीकारताना माझ्यासोबत वडील होते.
यावेळी ‘पद्मश्री’ पुरस्कार स्वीकारताना आईला सोबत घेऊन जा, असे वडिलांनी मला बजावले आहे. त्यामुळे पुरस्कार प्रदान सोहळयावेळी मी आईला सोबत घेऊन जाणारच आहे. यावेळचा पुरस्कार हा मला मिळालेला सर्वोच्च पद्म पुरस्कार असल्याने दोघांनीही उपस्थित राहावे, अशी माझी इच्छा आहे,’’ असे दीपिकाने सांगितले.
‘पद्मश्री’ पुरस्काराने ऑलिंपिकमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली, असे दीपिकाने म्हटले.