स्नोझिल्ला नावाच्या प्रचंड हिमवादळाने अमेरिकेच्या पूर्व किना-यावर हाहा:कार उडवला असून तुफानी वारे तसेच विक्रमी बर्फवृष्टीने किनारा उध्वस्त केला आहे. किमान १८ जण त्यात ठार झाले असून लाखो अमेरिकनांनी बर्फ खणून काढण्याची तयारी सुरू केली आहे.
उष्णकटिबंधातील वादळी वा-यांनी आलेल्या या हिमवादळाने अमेरिकेतील बहुसंख्य ईशान्येकडील किनारपट्टीवरील जनजीवन जवळपास ठप्प केले आहे. तीन फुट बर्फाचे थर साचले आहेत. किमान दहा राज्यांनी आणिबाणी जाहीर केली आहे. राक्षसी हिमवादळाचा ८ कोटी ५० लाख रहिवाशांवर विपरित परिणाम झाला आहे.
न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन या शहरांमध्येही जनजीवन ठप्प झाले आहे. हजारो घरांमध्ये वीज नाही आणि हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. हिमवादळामुळे कार अपघात, फावडय़ाने बर्फ काढण्यातील दुर्घटना आणि अंगातील तापमान कमी झाल्याने किमान १८ जण ठार झाले.