हातगाडीवर राबणाऱ्या हाती गावाचा कारभार

खडकवासला – धरणाच्या चौपाटीवर हातगाडीवर काम करणाऱ्या रजनी विष्णोबा कुंभार यांची खडकवासला गावाच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिले. कुंभार यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
खडकवासला येथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने कुंभार यांचाच अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी एस. जी. जगताप उपस्थित होते. या वेळी महादेव मते, संदीप मते, योगेश मते, नंदकिशोर मते, विकास रायकर, श्‍यामा खालकर, जनाबाई रणधीर हे सदस्य उपस्थित होते.  कुंभार यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण खडकवासला येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयात झाले. वडील विष्णोबा कुंभार यांच्याकडेच त्या राहतात. जास्त शिक्षण नसल्याने त्यांना मजुरी करणे भाग पडले. तरीही त्या दररोज सकाळी घरी पाचवीपर्यंतच्या मुलांची शिकवणी घेतात. त्यानंतर धरणाच्या चौपाटीवरील हातगाडीवर कामाला जातात. असा त्यांचा दिनक्रम आठ-दहा वर्षांपासून सुरू
आहे. मात्र, सरपंचपदाचा कारभार स्वीकारताना त्यांचे डोळे पाणावले होते.
सरपंचपदी काम करण्याची संधी मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. सुटीच्या दिवशी व वेळ मिळेल तेव्हा मी हातगाडीवर जाऊन काम करीत राहणार आहे. खरंतर मला प्रामाणिकपणाचेच फळ मिळाले आहे. २०१२ मध्ये निवडणूक झाली, तेव्हा भैरवनाथ ग्रामपरिवर्तन पॅनेलने मला उमेदवारी दिली. कष्टकरी समाजासह सर्वांगीण विकासासाठी मी काम करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *