मोनिका किरणापुरे हत्याप्रकरणातील चार आरोपींना जन्मठेप

बहुप्रतिक्षित मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणाचा निकाल लागला असून याप्रकरणी सत्र न्यायालयाने चार आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर, इतर दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने कुणाल अनिल जयस्वाल, प्रदीप महादेव सहारे, श्रीकांत सारकर, उमेश मराठे या चौघांनाही दोषी ठरवले. तर पुरावे नष्ट करण्याचा आरोप असलेल्या रामेश्वर सोनेकर आणि गीता मालधुरे या दोघांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मोनिकाच्या आई-वडिलांनी केली होती. मात्र नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने चारही जणांना जन्मठेप सुनावली. चारही आरोपींना फाशी व्हावी यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी देखील मोनिकाच्या आई-वडिलांनी दाखवली आहे.
११ मार्च २००१ रोजी नागपूरच्या नंदनवन परिसरात २१ वर्षांची मोनिका किरणापुरेची हत्या झाली होती. पोलिसांनी अनेक महिने तपास करुन याप्रकरणातील पाच आरोपींना अटक केली होती. भाड्याच्या गुंडांच्या मदतीने मोनिकाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. गुंडांना सुपारी देणाऱ्या कुणाल जयस्वालचे मोनिकाच्या वसतिगृहात राहणाऱ्या ऋषाली नावाच्या मुलीवर प्रेम होते. मात्र, ऋषालीने कुणालचे प्रेम नाकारल्याने रागावलेल्या कुणालने भाड्याच्या चार गुंडांना ऋषालीची हत्या करण्याची सुपारी दिली होती. मात्र, या गुंडांनी ऋषालीवर हल्ला करण्याऐवजी चुकून निष्पाप मोनिकाची हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *