उत्तर प्रदेशातील दादरी येथील घटना ताजी असताना मध्य प्रदेशातील हरदा रेल्वे स्थानकावर एका मुस्लीम दाम्पत्याकडे गोमांस असल्याच्या संशयातून गोरक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. गोमांस असल्याच्या संशयातून काहींनी त्यांच्याकडील सामानांची झाडाझडती घेतली.
येथील खिरिखिया स्टेशन परिसरात मोहमद हुसेन आणि त्यांची पत्नी नसीम बानो प्रवास करत असताना हा प्रकार घडला. गोरक्षा समितीच्या दोन कार्यकर्त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. भांडण केल्याप्रकरणी जोडप्याच्या नातेवाइकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली व नंतर जामिनावर सोडून देण्यात आले. हा प्रकार १३ जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. हे दाम्पत्य कुशिनगर एक्स्प्रेसने प्रवास करत होते. त्यावेळी ते बसलेल्या डब्यात काही जणांना त्यांच्या बॅगेत गोमांस असल्याचा संशय आला. १० ते १५ जणांनी या दाम्पत्याला दरडावत त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केली.