ज्याला अंगाखांद्यावर खेळवलं, त्याचाच मृतदेह 7 किमी खांद्यावरुन नेला!

ज्याला अंगाखांद्यावर खेळवलं, त्याचाच मृतदेह 7 किमी खांद्यावरुन नेला!

एकुलत्या एक, मूकबधिर मुलाचा डायरियाने मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पित्याने मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन चक्क सात किलोमीटरचे अंतर तुडवले. अत्यंत धक्कादायक आणि तितकीच क्लेशदायक अशी ही घटना गडचिरोलीतील एटापल्ली येथे घडली असून तोंदे मुरा पोटावी असे त्या माणासाचे तर संदीप हे त्याच्या मृत मुलाचे नाव आहे.
१० वर्षांचा संदीप मंगळवारी रात्री आजारी पडल्याने त्याच्या वडिलांनी हातातील काम सोडून त्याला उपचारांसाठी एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र बुधवारी त्याची प्रकृती खालावली आणि उपचारांदरम्यानच संदीपचा मृत्यू झाला. रुग्णालयापासून गाव लांब अंतरावर असल्याने आणि अंधार पडण्याची वेळ असल्याने वडील तोंद पोटामी यांनी मुलाचा मृतदेह गावी नेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडे वाहनाची मागणी केली. मात्र, डॉक्‍टरांनी त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष करत मृतदेह दुसऱ्या दिवशी नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे दुःखात असलेल्या पोटामी कुटुंब चिंतेत सापडले. त्यानंतर पोटावीने मुलाचा मृतदेह घेऊन जात असल्याचे डॉक्‍टरांना सांगितले. मात्र, त्यानंतरही डॉक्‍टरांनी गंभीरतेने न घेता एका रजिस्टरमध्ये मुलगा स्वतःच्या जबाबदारीवर नेत आहे, त्याला कमी-जास्त काही झाल्यास मी जबाबदार राहीन, असे लिहून घेतले व मृतदेह पालकांच्या स्वाधीन केला. सायंकाळी सहा वाजता डॉक्‍टरांसमोरच मुलाचा मृतदेह उचलून खांद्यावर घेतला. सात किमीचे अंतर पायपीट करत ते गावी पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती.
धक्कादायक बाब म्हणजे अनेकांनी या घटनेचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं पण मदतीसाठी कोणीच पुढे आलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *